जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची बैठकीनंतर घोषणा; वाळूज एमआयडीसीही बंद
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी 10 ते 18 जुलै दरम्यान कडकडीत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय आज विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, यांच्यासह खासदार डॉक्टर भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, आ.प्रदीप जैस्वाल, आ.अतुल सावे, आ.अंबादास दानवे,आमदार संजय शिरसाठ यांच्यासह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी बैठकीला हजर होते.
एक जूनला शहर अनलॉक झाल्यानंतर रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून तर दर दिवशी दीडशे ते दोनशेच्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत शहर पुन्हा लॉक डाऊन करावे अशी मागणी जोर धरू लागली. त्यानुसार आज विभागीय आयुक्तालयात लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांसोबत बैठक पार पडली.
या बैठकीनंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शहरासह वाळूज एमआयडीसी परिसरात 10 ते 18 जुलै दरम्यान कडकडीत संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली. शहर आणि जिल्ह्यातील सर्व उद्योग या दरम्यान बंद राहणार असल्याचेही ते म्हणाले. या बंद मधून अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आले आहे.
त्याच बरोबर जिवनावश्यक वस्तूंची दुकाने, फळ, भाजीपाल्याची दुकाने सुरू ठेवण्याबाबत मनपा आयुक्त तसेच पोलिस आयुक्त निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गेल्या दोन बैठकांमध्ये उपस्थित असलेले खा. इम्तियाज जलील यांनी आजच्या बैठकीला दांडी मारली. जिल्ह्याचे खासदार म्हणून जलील यांच्यावर मोठी जबाबदारी होती. मात्र त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने उलट-सुलट चर्चा होत आहे












